नक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत

“तुमचं आयुष्य केवळ दोन वर्ष उरलं आहे,” असं त्यांना डॉक्टरांनी म्हटलं त्यावेळी त्यांचं वय होतं २१ वर्षं. पण याच मृत्यूला ५५ वर्षे त्यांनी झुलवत ठेवलं. अनेकदा त्यांच्यात सलामी झडली.
मृत्यूला त्यांनी हरवलं देखील पण अखेर त्यालाही त्यांनी आज अकस्मात कवेत घेतले.
महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हातातून पारा निसटावा इतक्या अलगदपणे निवर्तले.

८ जानेवारी १९४२ ला इंग्लंडमधल्या ऑक्सफर्डमध्ये स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. त्यांचे वडील जीवशास्त्राचे संशोधक तर आई वैद्यकीय संशोधन सचिव.
संशोधनाचं बाळकडू त्यांना आपल्या आई-बाबांकडून मिळालं. अगदी बालपणापासूनच त्यांना गणित आणि विज्ञानाची आवड. विश्वाच्या निर्मितीचं गूढ काय आहे हे समजून घेण्यासाठी गणित आणि विज्ञानाची मदत होते, म्हणून ते या विषयांकडे वळले.

ऑक्सफर्ड विद्यापीठामधून भौतिकशास्त्रात प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर ते केंब्रिजमध्ये पीएचडीसाठी गेले. याच ठिकाणी त्यांची ओळख आपली भावी पत्नी जेन यांच्याशी झाली. जेन या आधुनिक भाषाविज्ञानाच्या विद्यार्थिनी होत्या. न्यू इअर पार्टीमध्ये त्यांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमामध्ये झालं. पुढे जाऊन त्यांना मोटार न्यूरॉन डिसीज आहे हे कळलं. या आजारामुळे हळुहळू आपलं शरीर पक्षाघातानं ग्रस्त होईल असं त्यांना समजलं. या आजारामुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते. याच्या सुरूवातीच्या काळात अशक्तपणा जाणवतो मग अडख़ळत बोलणे, अन्न गिळतांना त्रास होणे, हळूहळू चालणे-फिरणे आणि बोलणे बंद होत जाते. आधी ते खूप निराश झाले पण त्याच इस्पितळातील एका रोग्याला या असाध्य रोगाशी झगडतांना पाहून स्टीफन यांनाही आशेचे किरण दिसू लागले. हॉकिंग यांची प्रकृती ढासळण्यापूर्वी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नावेळी हॉकिंग यांना हातात काठी घेऊन चालावं लागलं होतं.

मोटार न्यूरॉन डिसीजनं त्यांच्या शरीरावर ताबा मिळवला होता, पण त्यांचं मन त्यांच्या पूर्ण नियंत्रणात होतं. आपल्या शारीरिक मर्यादांवर विजय मिळवून ते पुढं चालत राहिले. हातांमधली शक्ती जशी क्षीण होऊ लागली तसं ते किचकट गणितं आपल्या मनातच सोडवू लागले. गणिताची प्रमेयं ते आपल्या मनातच रचत असत. त्यांच्या या सवयीमुळेच स्टीफन हॉकिंग यांनी संशोधन क्षेत्रात बहुमूल्य कामगिरी केली असं त्यांचे सहकारी सांगतात. आपल्या कमकुवत स्थानांनाच त्यांनी आपल्या शक्तिस्थानांमध्ये परावर्तित केलं.

विश्वाची निर्मिती ही बिग बॅंगपासून झाली आहे असा सिद्धांत १९४० मध्ये मांडण्यात आला होता. पण या सिद्धांताला सर्वांनी मान्य केलं नव्हतं. स्टीफन हॉकिंग आणि त्यांचे सहकारी रॉजर पेनरोज यांनी यावर अभ्यास केला. विश्वाच्या निर्मितीला सुरुवात बिग बॅंगपासून सुरुवात झाली असं त्यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर विज्ञान क्षेत्रातल्या अनेकांनी बिग बॅंग थेअरीला मान्यता दिली. त्यांना असं जाणवलं की, कृष्णविवराचा जर आपण अधिक अभ्यास केला तर आपल्याला अनेक रहस्यांचा शोध लावता येईल.

क्वांटम मेकॅनिक्स आणि सापेक्षतावाद एकाच सिद्धांतामध्ये कसा मांडता येईल या दिशेनं त्यांनी विचार सुरू केला. विज्ञानातील दोन वेगवेगळे सिद्धांत एकत्र करणं हे महाकठिण काम होतं. पण त्यांनी ते नेटानं सुरू ठेवलं. अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर त्यांनी सांगितलं की कृष्णविवरं चमकू शकतात. या सिद्धांताला हॉकिंग रेडिएशन म्हटलं जातं.

वयाच्या ३५ व्या वर्षी हॉकिंग केंब्रिज विद्यापीठात लुकाशियन प्रोफेसर बनले. हे पद अत्यंत प्रतिष्ठेचं समजलं जातं. न्यूटन देखील लुकाशियन प्रोफेसर होते. एव्हाना हॉकिंग यांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक म्हणून ख्याती मिळवली होती, पण त्यांची प्रकृती खूप खालवत चालली होती. हालचाल करण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रिक व्हीलचेअरचा वापर सुरू केला.

वयाच्या ४३ व्या वर्षी त्यांना न्यूमोनिया झाला. हॉकिंग यांना जिनेव्हातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर तुम्ही तुमचा आवाज गमवाल याची कल्पना डॉक्टरांनी त्यांनी दिली. पण त्यांचे प्राण वाचवण्याच्या दृष्टीनं ते अत्यावश्यक होतं. या शस्त्रक्रियेमुळे त्यांना आपला आवाज गमवावा लागला. त्यांच्या मित्रांनी त्यांच्यासाठी एक खास उपकरण तयार केलं. संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली लिहून ती त्या संगणकात कार्यरत करून दिली. यामुळे संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून बोलणे हॉकिंग यांना शक्य झाले होते. त्याआधारे ते बोलूही लागले.

१९८८ साली हॉकिंग यांनी ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम ( काळाचा संक्षिप्त इतिहास) हे पुस्तक लिहिलं. आपण केलेल्या अभ्यासाचा उपयोग सामान्य वाचकाला व्हावा असं वाटून त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं. विज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांमध्ये ‘ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम’ची गणना होते. जेन आणि स्टीफन यांना तीन मुलं झाली. २५ वर्षं संसार केल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हॉकिंग यांनी त्यांची नर्स एलियन मेसनसोबत लग्न केलं. त्यांचं लग्न ११ वर्षं टिकलं त्यानंतर ते वेगळे झाले.

१९९९ मध्ये स्टीफन हॉकिंग यांचं नाव घराघरात पोहोचलं. याचं कारण म्हणजे एका प्रसिद्ध अॅनिमेशन सीरिजमध्ये त्यांचं पात्र दाखवण्यात आलं होतं. गंमत म्हणजे आपल्यावर आधारित असलेलं हे पात्र हॉकिंग यांना खूप आवडलं. त्यानंतर त्यांच्यावर आलेल्या ‘स्टीफन हॉकिंग्स युनिव्हर्स’मुळे ते आणखी लोकप्रिय झाले. सामान्य वाचकांसाठी त्यांनी खूप पुस्तकं लिहिली. २००९ मध्ये स्टीफन हॉकिंग यांना लुकाशियस प्रोफेसरच्या पदावरुन निवृत्त व्हावं लागलं. त्यावेळी ते ६७ वर्षांचे होते. पण यापुढे देखील आपण काम करत राहू असं ते म्हणाले. केंब्रिजमध्येच ते दुसऱ्या पदावर रुजू झाले. संशोधन आणि अध्यापनाचं कार्य ते अखेरपर्यंत करत होते.

दरम्यान हॉकिंग यांनी थेअरी ऑफ एव्हरीथिंगवर आपलं काम सुरूचं ठेवलं. आपल्या ‘द ग्रॅंड डिजाइन’ या पुस्तकात त्यांनी म्हटलं होतं, “फक्त एकच विश्व नसून अशी अनेक विश्व असू शकतात. त्यामुळे या विश्वाचं गूढ उकलण्यासाठी केवळ एकच ‘थेअरी ऑफ एव्हरीथिंग’ लागू होईल असं म्हणता येणार नाही.” म्हणजे गेली तीन दशकं त्यांनी थेअरी ऑफ एव्हरीथिंगवर काम केलं, पण आयुष्याच्या उत्तरार्धात ते म्हणाले, ‘अशी एकच थेअरी सापडणं हे कठीण काम आहे.’

२०१४ मध्ये त्यांच्या जीवनावर आधारित ‘थेअरी ऑफ एव्हरीथिंग’ हा चित्रपट आला. त्यांची पहिली पत्नी जेन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्यावर पुस्तक लिहिलं होतं, त्यावर या चित्रपटाची पटकथा आधारित होती. केंब्रिज विद्यापीठानं त्यांचा शोधनिबंध विद्यापीठाच्या वेबसाइटवर सर्वांसाठी जेंव्हा खुला केला तेंव्हा तो शोधनिबंध तब्बल २० लाख जणांनी पाहिला. यावरूनच त्यांच्या लोकप्रियतेची आपल्याला कल्पना येऊ शकते.

आपल्या दुर्धर आजारांवर मात करणारे स्टीफन हॉकिंग अत्यंत आनंदी राहत. एकदा एका पत्रकाराने त्यांना यावर विचारलं तेंव्हा त्यांनी मी आयुष्याचा आस्वाद घेतो असं उत्तर दिलं. माझ्या आवडी निवडी आणि जगण्याच्या व्याख्या मला आनंदी ठेवतात अशी पुस्ती त्यांनी जोडली. पत्रकाराने पुन्हा पृच्छा केली – ‘आपण एक महान भौतिकशास्त्रज्ञ म्हणून विश्वविख्यात आहात मग तुमच्या अशा कोणत्या आवडी निवडी आहेत की ते ऐकताच लोक हैराण होतील ?’
हॉकिंग उत्तरले – ‘मला सर्व शैलीतलं संगीत आवडतं. पॉप, क्लासिकल, ऑपेरा सगळं ऐकतो मी ! इतकंच नव्हे तर माझा मुलगा टिम याच्या सोबत फॉर्म्युला वन कारच्या रेसिंगची मजाही मी घेतो.’ हॉकिंगनी दिलेलं उत्तर ऐकून पत्रकार तोंडात बोटं घालायचा राहिला होता !

लोकांसाठी काही संदेश द्याल का असं विचारलं की ते म्हणायचे,
‘अधिक महत्वाचीच कामं करण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजेत.’
‘माझ्याकडं इतकं काही आहे की ज्यावर मला काम करायचे आहे, त्यामुळे वेळ वाया घालवण्याविषयी मला चीड आहे.’
‘तुम्हाला आयुष्य कितीही कठीण वाटलं तरी तुम्ही नेहमी काही न काही करू शकता आणि सफल होऊ शकता.’
‘तुम्ही जर नेहमी संताप आणि तक्रारी करत राहिलात तर लोकांसाठी तुमच्याकडे वेळ राहणार नाही.’
‘जे लोक म्हणतात की, ‘सगळं काही नियतीनं आधीच निश्चित केलेलं असतं आणि ते बदलण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही’ ते लोक देखील सडक ओलांडताना दोन्ही बाजूस पाहतात !’
‘मी मृत्यूला घाबरत नाही पण मला मृत्यूची घाईही नाही. त्याची उकल करण्यासाठी माझ्याकडे खूप काही आहे.’
हॉकिंग यांची ही प्रसिद्ध अवतरणे खूप काही सांगतात.

त्यांच्या निधनाने कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.
एका संघर्षमय विज्ञानपर्वाची अखेर झाली असली तरी त्यांचे जीवन अनंत काळासाठी जगाला प्रेरणादायी ठरेल.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s